राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत ६ ऑक्टोबरला होणार सुनावणी

पुणे, १५ सप्टेंबर २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. महाआघाडी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार यांच्या गटाने पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा करत निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. तर राष्ट्रवादीमध्ये फूट नसल्याचे शरद पवार बोलत असले, तरी हे प्रकरण आता थेट निवडणूक आयोगाकडे गेले आहे. दोन्ही गटाकडून आमचीच राष्ट्रवादी खरी असल्याचा दावा केला जात असल्यामुळे, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फूट पडल्याचे मान्य केले असून दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावले आहे.

राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील फूट पडली आहे. यात आता राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात पोहचला आहे. अजित पवार यांच्या गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आप-आपली भूमिका मांडणार आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. पक्षात फूट पडली नसल्याचे शरद पवार वारंवार सांगत आहेत. पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील हे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असल्याचा दावा शरद पवार करत आहेत. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव तात्पुरते गोठवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी वैयक्तिकरित्या सुनावणीसाठी येण्यास किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थिती नोंदवण्यास सांगितले आहे. आता पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा