उद्धव ठाकरेंच्या गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या

मुंबई, १ सप्टेंबर २०२३ : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील खंदे समर्थक तथा माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकालगतच्या रुळावर त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. त्यामुळे त्यांनी लोकलपुढे उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा पद्धतीने मृतदेह आढळल्याने घाटकोपर, विक्रोळी परिसरात खळबळ उडाली आहे.

मोरे हे डॅशिंग नेते होते. अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा. प्रत्येक कामात त्यांचा पुढाकार असायचा. धडाडीचा नेता, कार्यकर्ता म्हणून विक्रोळी आणि घाटकोपर परिसरात त्यांचा चांगला परिचय होता. सुधीर मोरे यांचा मृतदेह काल गुरुवारी रात्री रेल्वे रुळावर पडलेला आढळला. सुधीर मोरे एका खासगी मिटिंगला जातो म्हणून घराबाहेर पडले होते. त्यांनी सोबत बॉडीगार्डही नेले नव्हते. बराच उशीर झाला तरी मोरे परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोध घेतला असता घाटकोपर रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे झालेले होते. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मोरे यांच्या मृत्यूचे वृत्त वाऱ्यासारखं पसरल्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. गुरुवारी रात्री नेमकं काय घडलं? मोरे या ठिकाणी का आले होते? कुणाला भेटले होते का? की एकटेच होते? आदी प्रश्नांचा शोध घेतला जात आहे.

दुसरीकडे, सुधीर मोरे यांच्या आत्महत्येविषयी ब्लॅकमेलिंगचे कनेक्शन उजेडात येत आहेत. सुधीर मोरे यांना गत काही महिन्यांपासून कुणीतरी ब्लॅकमेल करत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलले. त्यांनी २ महिन्यांपूर्वीच काही कॉल रेकॉर्ड करण्यासाठी एक नवा मोबाईल खरेदी केला होता. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा, अशी मागणी त्यांच्या निकटवर्तीयांनी केली आहे.

सुधीर मोरे हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते. ते रत्नागिरीचे शिवसेना संपर्कप्रमुख, शिवसेनेचे नगरसेवक व विभागप्रमुखही होते. सुधीर यांनी लोको दोस्त नावाची संघटना स्थापन केली होती. त्यातूनच त्यांचा राजकारणातील प्रवास सुरू झाला होता. त्यांच्या वहिनीही माजी नगरसेवक होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांचीच साथ देणे पसंत केले. सुधीर मोरे यांनी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदार संघातून भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना पराभव सहन करावा लागला. त्यांच्या मृत्युमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा