मुंबई, १८ एप्रिल २०२३: देशभरातील अनेक राज्यांत पुढचे ४ ते ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. वायव्य भारतासह मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागांत तापमान वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे देशभरातील उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष नको असा इशारा IMD मुंबई ने दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे काही दिवस देशभरातील तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. काही भागांत तापमान हळूहळू वाढून तुरळक पाऊस पडणार असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच १८ ते १९ एप्रिल दरम्यान पूर्व पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये उष्णतेची लाट आहे. पुढील २४ तासांत सिक्कीम, ओडिशामध्ये तर पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवस उष्णता वाढणार असल्याचे हवामान विभागाने दिलेल्या माहितीत सांगितले आहे. पुढच्या दोन दिवसांत २ ते ३ अंशाने तापमान वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पुढचे पाच दिवस ढगांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर