पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

नवी दिल्ली, २५ ऑक्टोंबर २०२०: पंधरा दिवसांहून आधिक काळ रखडलेला मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास तीन दिवसांपूर्वी सुरु झाला आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत संपुर्ण देशातून तो माघारी जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र, पुढील दोन दिवस पुन्हा पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळं दसऱ्याच्या दिवशीही पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळं नेहमीच्या वेळेपेक्षा ही जास्त काळ यंदा पाऊस टिकला आहे. देशात मोसमी वारे दाखल होऊन चार महिन्यांपेक्षा ही जास्त काळ उलटला आहे. ऑक्टोबर महिन्यात पावसानं पूर्ण काढता पाय घेतलेला असतो आणि या महिन्यात कडाक्याचं ऊन असतं. मात्र, यंदा ऑक्टोबर महिना देखील पावसाळ्यात जमा झाला. ऑक्टोबर महिना आणि कडाक्याचं ऊन हे समीकरण नेहमीच आपल्यासमोर उभं असतं. मात्र, यंदा परतीचा पाऊस लांबल्यानं ऑक्टोबर महिन्यातला उन्हाचा तडाखा देखील कमी झाला आहे.

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, २५ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे. २६ ऑक्टोबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. राज्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहिल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा