हिंजवडी आयटी पार्कमधील कोंडी फोडणार! पोलिस आयुक्तांचे कठोर निर्देश तात्काळ वाहतूक बदल आणि अतिक्रमणे हटवण्याचे आदेश

Hinjawadi IT Park traffic congestion
हिंजवडी आयटी पार्कमधील कोंडी फोडणार!

Hinjawadi IT Park traffic congestion update: हिंजवडी आयटी पार्कमधील (Hinjawadi IT Park) वर्षानुवर्षांची वाहतूक कोंडी (Traffic congestion) आता खऱ्या अर्थाने सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शासनाच्या निर्देशानुसार, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुरुवारी (दि. २४) स्वतः आयटी पार्कमधील रस्त्यांची पाहणी करत कोंडी फोडण्यासाठी धडाकेबाज उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. तात्पुरत्या बॅरिकेड्सपासून ते कायमस्वरूपी वाहतूक बदलापर्यंतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

आयुक्तांची ‘ऑन-द-स्पॉट’ पाहणी आणि महत्त्वाचे निर्णय

पोलिस आयुक्त चौबे यांनी अधिकाऱ्यांसह आयटी पार्कमधील विविध ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये विरुद्ध दिशेने सुरू असलेल्या वाहतुकीच्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले. तसेच, काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर महिनाभरासाठी वाहतूक वळविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. सातत्याने कोंडी होणारे चौक आणि रस्ते, काही ठिकाणी एकेरी वाहतूक करणे, अशा उपायांचा यात समावेश आहे.

पाहणीदरम्यान, हिंजवडी वाहतूक विभागाच्या कार्यालयापासून सुरुवात करत क्रोमा चौकातील मेट्रो स्टेशनच्या जिन्याने व्यापलेला आठ मीटर रस्ता कमी करण्याची सूचना केली. विप्रो सर्कल येथे ‘फ्री लेफ्ट’ सुरू करण्यात आला आणि रस्त्याची दुरुस्ती करून वाहतुकीत बदल केले. डॉलर कंपनीजवळील नाल्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेशही त्यांनी दिले. एमआयडीसी सर्कल येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना थांबवण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले.

‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ अहवालाची अंमलबजावणी

यापूर्वी ‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ मोहिमेंतर्गत राबवलेल्या सह्यांच्या मोहिमेतून सुचवलेल्या उपाययोजनांचा ५७ पानी अहवाल पोलिस आयुक्त चौबे यांना सादर करण्यात आला. या अहवालात कोणत्या ठिकाणी काय उपाययोजना कराव्यात याचे जिओ टॅगिंग केले आहे. यामुळे तीन ते चार महिन्यांत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्वास सचिन लोंढे यांनी व्यक्त केला.

यावेळी सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी दीप्ती सूर्यवंशी, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पोलिस आयुक्त आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बॅरिकेड्स, मनुष्यबळ आणि कायमस्वरूपी तसेच पोर्टेबल सिग्नल उपलब्ध करण्याबाबतही चर्चा झाल्याचे सचिन लोंढे यांनी सांगितले. तसेच, सेवा रस्त्यावरील रोहित्र (डीपी) हटवण्याबरोबरच जांभूळकर चौक व पेट्रोल पंप चौकातील सर्कल अर्धे करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.या सर्व उपाययोजनांमुळे हिंजवडीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे