गरम पाण्यानं कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

नवी दिल्ली, ९ मे २०२१: संपूर्ण जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. भारतात तर संसर्ग आपल्या उच्चतम स्तरावर गेलेला दिसत आहे. देशात दररोज चार लाखांपेक्षा जास्त नवीन प्रकरणं नोंदवली जात आहेत. असं असताना औषधांचा आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा देशभर जाणवत आहे. यादरम्यान कोरोना पासून बचाव करण्यासाठी सोशल मीडियावर अनेक उपाय देखील सांगितली जात आहेत. मात्र अशा घरगुती उपायांमध्ये खूपच कमी सत्यता असते. केंद्र सरकारनं वारंवार अशा चुकीच्या उपचारांबाबत जनतेला सावध देखील केलं आहे.
अशा परिस्थितीत काहीजण गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला देत आहेत. गरम पाणी पिल्यानं किंवा गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, गरम पाण्यानं कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
याबाबत माहिती केंद्र सरकारनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. केंद्र सरकाच्या MyGovIndia या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.  गरम पाणी प्यालाने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनापासून बचाव होत नाही. कुठल्याही ऐकवी माहितीवर विश्वास ठेवू नये”, असं केंद्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा