सातारा, १० जुलै २०२३ : दोन महिन्या पूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून काही आमदारासमावेत ते बाहेर पडले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. हे दोन मोठे भूकंप झालेले असतानाच आता तिसरा भूकंपही होणार असल्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीच हा दावा केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना चव्हाण यांनी हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात आता कोणता नवीन भूकंप होणार याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
अजितदादाच्या गटाकडे ३६ पेक्षा जास्त आमदार नाहीत हे सिद्ध झाल्यास अजितदादाच्या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हाव लागेल. तसे झाले तरच त्यांचे निलंबन रद्द होईल असे कायदा सांगतो. आतापर्यंत फुटीर गटाकडे ३६ आमदारही दिसत नाहीत. काही आमदार अटी टाकून त्यांच्याकडे येत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांनी नऊ मंत्र्यांचे निलंबन केले आहे. मग विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहे? असा सवाल करतानाच हा संपूर्ण पक्षपातीपणा आहे. अजितदादा गटाकडे ३६ आमदारांचे संख्याबळ झाले नाही तर पुन्हा मोठा भूकंप होणार आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
हा फक्त राष्ट्रवादीचा प्रश्न नाही. तर हा राज्याचा प्रश्न आहे. राज्यात वैध सरकार आहे की अवैध सरकार आहे हे यावरून ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षांना शिवसेना आमदारांच्या निलंबनाबाबत १० ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे. आधी खोक्याची भाषा वापरली आता मंत्रीपदाची भाषा आहे. राज्याच्या प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष नाही. या सगळ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. सत्तेत राहण्यासाठी भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता साथ देत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
७० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असेल तर मग कारवाई का केली नाही? ती त्यांची जबाबदारी होती. पक्षाचे नाव घेऊन आरोप करत असाल तर सखोल चौकशी झाली पाहिजे. कर्नाटकाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी तुटल्याशिवाय पुढच्या निवडणुकीला सामोरे जाता येणार नाही हे भाजपला माहीत आहे, असेही चव्हाण म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर