अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर केला ग्रेनेडने हल्ला, एक जवान जखमी

जम्मू-काश्मीर, 16 जून 2022: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केला. या घटनेत एक जवान जखमी झालाय. दहशतवाद्यांनी पोलिस स्टेशनवर ग्रेनेड फेकले. ही घटना पादशाही बाग परिसरातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांची माहिती घेतली जात आहे. यात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केलीय. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. बिजबेहारा येथील पादशाही बाग येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं. अहमदउल्ला असं जखमी पोलीस जवानाचं नाव असून तो हेड कॉन्स्टेबल आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये हाइब्रिड दहशतवादी सुरक्षा यंत्रणांसाठी एक नवीन आव्हान म्हणून समोर आले आहेत. गेल्या दोन महिन्यांत खोऱ्यातील विविध भागातून डझनहून अधिक हाइब्रिड दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, हाइब्रिड दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये 2 महिन्यांत टार्गेट किलिंगच्या 6 घटना घडवून आणल्या. दहशतवाद्यांचा हा नवा मार्ग असून हाइब्रिड दहशतवादी असल्याचा दावा करणारे बहुतांश सदस्य लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल सातत्याने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावत आहेत. यापूर्वी सुरक्षा दलांनी लष्कराच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. काश्मीरमधील कुलगा चकमकीत बँक मॅनेजर विजय कुमारचा मारेकरीही मारला गेला. शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. दुसरं मोठं यश कुलगाममध्ये मिळालं. येथे कुजार भागात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला घेरले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा