राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ संपन्न

बारामती, २० जानेवारी २०२१: ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सोमवार दि.१८ जानेवारी ते१७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार असून अभियानाचा उद्घाटन समारंभ उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टी.सी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मुरूमकर प्रमुख पाहुणे डॉ. विलास कर्डिले व डॉ. भगवान माळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मुरूमकर म्हणाले “अपघातात तरूणांचे मृत्यु ही चिंतेची बाब आहे. तरूणांना रस्ता सुरक्षा विषयक माहितीचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्षे महाविद्यालयात रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन सुरू असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांचा अपघात झालेला नाही. रस्त्यावरील वाहतूकीच्या गुन्ह्याकरीता दंडाच्या रकमेमध्ये केली जाणारी वाढ ही कायद्याचा धाक बसण्यासाठी आवश्यक आहे.”

डॉ. कर्डिले व डॉ. माळी यांनी देखील उपस्थितांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले. उप प्रादेशिक अधिकारी संजय धायगुडे यांनी अभियानामध्ये राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. शाळा, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा वेबीनारव्दारे रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात येईल तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहन वितरक, मोटार ड्रायव्हींग स्कूलचालक यांच्या सौजन्याने शहरात बॅनर लावण्यात येतील. तसेच टोलनाक्यावर वाहनचालकांची नेत्रतपासणी करणे, साखर कारखान्यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना परावर्तक बसविणे, वाहनचालकांचे प्रबोधन करणे, ओव्हरलोड, परावर्तिका नसणे, वाहनांचे दिवे चालू नसणे, हेल्मेट, मोबाईलचा वापर, अवैद्य प्रवासी वाहतूक इत्यादी बाबींसाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे धायगुडे यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्याहस्ते वाहनचालकांसाठी मार्गदर्शक सूचनांच्या माहितीपत्रकांचे अनावरण व रस्ता सुरक्षा विषयी चित्रफिती दर्शविणाऱ्या एलईडी व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहा. मोटार वाहन निरिक्षक श्रीमती हेमलता मुळीक यांनी केले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा