४ फेब्रुवारी २०२५ नागपूर : भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडचे यजमानपद भूषवत आहे. ज्यामध्ये दोन्ही संघात पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये ८ सामने खेळणार आहेत. या दोन्ही उभय संघात ५ टी-२० मालिका खेळवली गेली असून भारतीय संघाने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ही मालिका ४-१ ने जिंकली आहे. येत्या ६ फेब्रुवारी पासून दोन्ही उभय संघात एकदिवसीय क्रिकेटची मालिका सुरू होईल आणि शेवटचा सामना १२ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. पहिला एकदिवसीय सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे आणि त्यासाठी दोन्ही संघ मैदानावर पोहोचले आहेत.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात खूप दिवसानंतर एकदिवसीय क्रिकेटचा सामना होणार आहे. यांच्यात शेवटचा एकदिवसीय सामना २०२३ मध्ये झाला होता. त्यामुळे दोन्ही संघामधील संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
एकदिवसीय सामन्यात कोणाचा पगडा भारी
भारत आणि इंग्लंड यांच्यात १९७४ मध्ये एकदिवसीय सामन्यातील पहिला सामना खेळवण्यात आला होता आणि शेवटचा सामना २०२३ मध्ये झाला होता. आतपर्यंत पाहिले तर एकदिवसीय सामन्यामध्ये दोन्ही संघ १०७ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात टीम इंडियाने ५८ सामने आपल्या नावावर केले आहेत, तर इंग्लंड संघाने ४४ सामने जिंकले आहेत. भारताच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात इंडियाने ५२ पैकी ३४ सामने जिंकले असून इंग्लंड संघाने १७ सामने जिंकले आहेत. नुकतीच झालेल्या टी-२० मालिकेत भारताने ४-१ ने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत विजयाचा दावेदार म्हणायला हरकत नाही परंतु इंग्लंड संघाला सुद्धा आपल्याला कमी लेखता येणार नाही. टी-२० मालिकेत मिळालेल्या मोठ्या पराभवाकडून इंग्लंड संघ नक्कीच आपल्या चुका सुधारेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर