रत्नागिरी ५ नोव्हेंबर २०२३ : उद्योग संचालनालय, सीडबी आणि आयडीबीआय इंडस्ट्रिज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार आणि उद्योजक निर्मितीसाठी होत असलेल्या ,’इग्नाईट’ या कार्यशाळेचे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरीतील स्वयंवर सभागृहात उद्घाटन झाले. याठिकाणी आयोजित केलेल्या वस्तू विक्री प्रदर्शनाचे देखील सामंत यांनी फीत कापून उद्घाटन केले. या प्रदर्शनाची पाहणी करत त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. अशा कार्यशाळा तालुक्यात झाल्या पाहिजेत. यातून उद्योजकांसाठीच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचून नवे उद्योजक निर्माण होतील, अशी अपेक्षा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. .
या कार्यशाळेच्या माध्यमातून केंद्र व राज्याच्या योजना विशेषत: पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, विश्वकर्मा आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तळागाळात पोहचल्या पाहिजेत. यातून नवे उद्योजक निर्माण होतील, त्यासाठी बँकांनी सकारात्मक आणि संवदेनशील दृष्टीकोण ठेवावा, अशी अपेक्षा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या. उद्योगमंत्री श्री. सामंत मार्गदर्शन करताना म्हणाले, की ज्यावेळी महाराष्ट्रात ताकदीने स्टार्टअप सुरु होईल, तेंव्हा खऱ्या अर्थाने रोजगार मिळणार आहे. सीएमईजीपी तळागाळात पोहचवू शकलो, तर अनेक लोकांना रोजगार मिळेल. अनेक लोक उद्योजक बनतील. नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे निर्माण होतील. बँकांची मानसिकता सकारात्मक असायला हवी. कर्ज मिळालेला कर्जदार १२ लाखांचे १२ कोटी करु शकतो, हा आत्मविश्वास बँका त्यांच्यामध्ये निर्माण करु शकतात. बँकांकडे गेल्यानंतर सकारात्मकता दाखवत आठ दिवसात कर्ज मंजूर केलेल्या बँकांना मी धन्यवाद देतो.
बँकांची, अधिकाऱ्यांची मानसिकता अशी असली पाहिजे की दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा मी जादा प्रकरणे मंजूर करेन. त्याचबरोबर अधिकारी आणि बँकांनीं व्यवस्थितरित्या योजनांचे मार्गदर्शन करावे. या योजनांचा प्रचार आणि प्रसार अशा कार्यशाळांमधून झाला पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी अशा कार्यशाळा ठेवा. त्यांच्या मुलांना या योजनांचा लाभ झाला पाहिजे. जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे मंजूर करुन नवे उद्योजक घडवा. त्यांना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे करा, असे आवाहनही उद्योगमंत्र्यांनी केले. वैभवी बने या लाभार्थीने मनोगत व्यक्त करुन आपला अनुभव सांगितला.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण यावेळी लाभार्थ्यांना करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. व्यवस्थापक हरिभाऊ आंधळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक नवीन निश्चल, प्रांताधिकारी जीवन देसाई, अग्रणी बँक व्यवस्थापक मुकुंद खांडेकर आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर