यंदा गणेशोत्सवावर महागाईचे विघ्न! पीओपी मूर्ती असूनही मिळणार महाग, टंचाईचीही शक्यता

This Year, Inflation Casts a Shadow on Ganeshotsav! POP Idols to Be Costly Despite Availability, Shortage Likely
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, यंदा उत्सवावर महागाई आणि गणेशमूर्तींच्या टंचाईचं गंभीर संकट घोंघावत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींवरील बंदी उशिरा उठवण्यात आल्यामुळे मूर्ती निर्मितीवर थेट परिणाम झाला असून, यंदा बाजारात सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी कमी मूर्ती उपलब्ध राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दुसरीकडे, रंग, शाडू माती, साच्यांचा साहित्य, वाहतूक खर्च यांसारख्या कच्च्या मालाच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे मूर्तींचे दरही सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे.

पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यात आल्यानंतर अनेक मूर्तिकारांनी यंदा मूर्ती बनवण्याचं कामच थांबवलं होतं. मात्र, उच्च न्यायालयाने अटी व शर्तींसह ही बंदी मागे घेतल्यानंतर मूर्तिकारांनी काम पुन्हा सुरू केलं, परंतु वेळेअभावी मूर्ती निर्मितीत मोठी अडचण निर्माण झाली. परिणामी पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील अनेक शहरांमध्ये नेहमीच्या तुलनेत ३० ते ५० टक्के मूर्तींची घट झाली आहे.

मूर्तिकार गौतम गायकवाड यांनी सांगितलं, “कच्चा माल प्रचंड महाग झाला असून त्यामुळे मूर्तींचे दरही वाढले आहेत. तरीही ग्राहकांचा विश्वास कायम राहावा, यासाठी आम्ही शक्य तितक्या किमान दरात मूर्ती देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र शासनाच्या धोरणांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे आम्हाला वेळेवर मूर्ती बनवता आल्या नाहीत.”

या परिस्थितीचा परिणाम म्हणून यंदा गणेशमूर्तींच्या खरेदीसाठी लवकरच गर्दी उसळण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच अनेक ठिकाणी मूर्तींचं बुकिंग पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्य तितक्या लवकर मूर्ती खरेदी करून संभाव्य टंचाईपासून वाचण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले