पंढरपुर, ५ जिला २०२० : सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकुळ घातला आहे देशात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या साडे सहा लाखाच्या घरात गेली आहे तर महाराष्ट्रात बाधितांची संख्या दोन लाखांच्या आसपास गेली आहे. सरकारने काही अटी व शर्तींवर अनलॉक केले खरे परंतू लोकांच्या निष्काळजीपणा व बेजबाबदारपणामुळे या संख्येत अजून भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत आहे.
सध्या हॉटेल्स , मॉल्स, चित्रपटगृहे बंद आहेत. परंतू काही मंदिरांना उघडण्यास सरकारने परवानगी दिली होती परंतू लोक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून आले. यामुळे काही मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय काही मोठ्या मंदिर समितीने घेतला आहे. याच धर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर १५ जुलैपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे, या संदर्भात मंदिर समितीने एका प्रसिद्धी पत्रकात हि माहिती दिली आहे.
कोरोना विषाणूमुळे १७ मार्च पासून श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. या दरम्यान चैत्री तसेच आषाढी यात्रा सुद्धा रद्द करण्यात आल्या.
राज्यात लॉक डाऊनचा कालावधी वाढवलेला असून पंढरपूर शहरातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. नुकतीच आषाढी यात्रा संपन्न झाली असली तरी ती प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली.
१७ मार्चनंतर मंदिर समितीने २ वेळा दर्शन बंदीचा कालावधी वाढवला आहे. यापूर्वी जाहीर केल्यानुसार ३० जूनपर्यंत दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आता ही मुदत वाढवून १५ जुलै पर्यंत केली यामुळे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. ९ जुलै रोजी प्राक्षाळ पूजा होणार असून त्यानंतर विठ्ठलाचे ऑनलाइन २४ तास सुरू असलेले दर्शनही बंद होणार असल्याची माहिती मंदिर समितीने कळवली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी