दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, राष्ट्रवादीचा भाजपला टोला

मुंबई, ४ डिसेंबर २०२२: भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दलची एक वेगळीच कहाणी सांगितली आहे. राष्ट्रवादीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडियोत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले आहे. तर हा व्हिडिओ शेअर करताना “दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या” असे ट्विट देखील राष्ट्रवादीने केले आहे.

या व्हिडिओमध्ये प्रसाद लाड म्हणतात,”संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे सुरुवात कोकणात झाली.” त्यांच्या या विधानावरून राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने निवडणूक लढवतात, परंतु महाराजांचा इतिहासच यांना माहिती नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत ही खूप लाजिरवाणी बाब आहे, असे म्हणत राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली आहे.

प्रसाद लाडांच्या या व्हिडियोनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली. “शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांची राजधानी रायगड होती,असे आम्ही इतिहासात वाचले आहे. मात्र लाड म्हणतात की शिवरायांचा जन्म कोकणात झाला. उद्या गुजरात महोत्सव घ्यायचा असेल तर गुजरातच्या लोकांना खुश करण्यासाठी ते शिवरायांचा जन्म गुजरातच्या सुरत मध्ये झाला असे म्हणतील. हे योग्य नाही” या विधानानंतर फक्त माफी मागू नये तर नाक रगडून प्रायश्चित्त करावे. अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली. त्याचप्रमाणे याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुक समर्थन कारणीभूत आहे असेही ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा