मुंबई, ८ सप्टेंबर २०२३ : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. हायकोर्टाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन FIR रद्द केले आहेत. एक FIR पुण्यात तर दुसरा मुंबईत नोंदवण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभगाच्या प्रमुख या नात्याने विरोधी पक्षातल्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचं हे प्रकरण आहे.
फडणवीस सरकारनंतर जेव्हा राज्यात महाविकास आघाडी सरकार आल, त्यानंतर रश्मी शुक्लांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. नाना पटोले, संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन केल्याप्रकरणी हे दोन FIR करण्यात आले होते. ते रद्द करण्यात आले आहेत. पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे, कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्यास राज्य सरकारने नकार दिला होता.
काय आहे प्रकरण?
रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात, तर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलिसांच्या बदलीमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार उघड केला होता. या संदर्भात तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना लिहिलेलं पत्र त्यांनी उघड केलं होतं. तसंच याप्रकरणातील पेन ड्राईव्ह देखील समोर आणला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे