सोलापूर, दि. १९ जुलै २०२०: अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. याबाबत सर्वत्र चर्चा देखील चालू आहे. राम मंदिराचे काम सुरू करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करण्यात असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. तसेच याची तारीख देखील आता समोर आली आहे. मात्र हे सर्व होत असताना देशात कोविड -१९ चा प्रादुर्भाव देखील झपाट्याने वाढत आहे. दर दिवसा आता ३० ते ३५ हजारांचा आकडा समोर येत आहे. असे असताना भाजप राम मंदिर उभारण्याबाबत घाई का करत आहे यावर शरद पवार यांनी वक्तव्य केले आहे.
“राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा,” असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. कोविड -१९चा वाढता प्रादुर्भाव याबाबत आढावा घेण्यासाठी शरद पवार आज सोलापूर मध्ये आले होते. आढावा बैठक आटोपल्यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपला चिमटे काढत राम मंदिरावरून टोला लावला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, “सध्या देशाबरोबर राज्यावर कोविड -१९ चे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीमध्ये योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु काही लोक मंदिर बांधण्याच्या तयारीत आहेत. मंदिर बांधून ही समस्या सुटणार आहे का..? काही मंडळींना असे वाटत आहे की मंदिर बांधून हे संकट संपणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांनी मिळून या संकटावर मात करण्यासाठी योग्य ती रणनीती आखणे गरजेचे आहे. परंतु जर राम मंदिर बांधून हे संकट संपणार असेल तर नक्कीच राम मंदिर बांधा… फक्त कोविड -१९ चे हे संकट दूर व्हावे हीच आमची इच्छा आहे”.
यावेळी त्यांनी राज्याच्या व देशाच्या आर्थिक स्थितीवर देखील वक्तव्य केले. ते म्हणाले की कोविड -१९ मुळे संपूर्ण देशभर टाळेबंदी केलेले आहे. त्यामुळे आर्थिक मंदीची परिस्थिती उद्भवली आहे. यावर देखील केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी लक्ष केंद्रित करून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
न्यूज अनकट प्रतिनिधी