जालना, दि.२८ मे २०२०: कष्टकरी शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असेलेले व शिवसेनेचे कणखर नेतृत्व म्हणुन ओळखले जाणारे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मनरेगा योजनेमार्फत फळबाग लागवड करण्याची तरतूद करण्याची मागणी राज्य सराकरकडे केली आहे.
बुधवारी (दि.२७) रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी मंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जि.प. माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, युवा सेनेचे अभिमन्यु खोतकर, पंडितराव भुतेकर, भाऊसाहेब घुगे आदींची उपस्थिती होती.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने मनरेगा योजनेमार्फत जर फळबागा लागवड केले तर जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध होईलच. शिवाय फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच मनरेगाच्या अंमलबजावणीतील उदासिनता कमी करुन कामे हाती घ्यावीत, रोहयो अंतर्गत पुर्ण केलेल्या सिंचन विहीरींचे अनुदान शेतकऱ्यांना द्यावे, मागेल त्या शेतकऱ्यास ठिबक सिंचन योजनेचा लाभ देऊन त्यावर ९० टक्के सबसिडी द्यावी. तसेच मागेल त्या शेतकऱ्यास फळबाग लागवडीसाठी सहाय्य करावे.
मनरेगा अंतर्गत नाला खोलीकरण, बांधबंदिस्तीची कामे करावी, मनरेगा कामांची प्रलंबीत देयके अदा करावी, पानंद रस्त्यांची कामे पुर्ण करावीत, रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची प्रलंबीत देयके अदा करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रेशीम शेतीस सहाय्य करावे, मनरेगा अंतर्गत शेततळे खोदकामास मान्यता द्यावी यासह विविध समस्या सोडवण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: