जालना २० फेब्रुवारी २०२४ : जालना येथील लोखंडी सळ्या निर्मितीच्या उद्योगात प्रसिद्ध असलेल्या राजुरी कंपनीचे वसुली अधिकारी रामेश्वर श्रीमाली यांना लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात जालना एलसीबीला यश आले आहे. श्रीमाली हे बुलढाणा जिल्ह्यातून वसुली करून १४ फेब्रुवारीच्या रात्री जालनाकडे येत होते. त्यांची कार बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा घाटामध्ये आडवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली तसेच त्यांच्याजवळील लाखो रुपयांची रोकड लंपास केली गेली. त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांचे व चालकाचे हातपाय बांधून शेतात टाकले होते. याप्रकरणात अंढेरा पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
धाडसी दरोड्यायामुळे जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी याप्रकरणात लक्ष घालून तपास चक्रे फिरवत या दरोड्याचा पर्दाफाश केला आहे. हा दरोडा टाकण्याची टिप कंपनीतीलच एका कामगारानेच दिली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. कंपनी मालकाला माहिती होऊ न देता वसुली अधिकाऱ्यांच्या वाहनांना जीपीएस बसवून त्याची लोकेशन व इत्यंभूत माहिती दरोडेखोरांना पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस निरीक्षक खनाळ यांच्या तपास पथकाने हा दरोडा 15 जणांच्या टोळीने घातला असल्याचा छडा लावला असून, त्यापैकी ५ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या दरोडेखोरांच्या ताब्यातून एक होंडासिटी कार, रोख ६ लाख जप्त करण्यात आले असून, त्यांना बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी