पवारांना खुर्ची नेऊन देणाऱ्या संजय राऊतांचं जितेंद्र आव्हाडांनी केलं कौतुक

मुंबई, 10 डिसेंबर 2021: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत खुर्ची घेऊन जात असल्याचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी टीका केली आहे. भाजप कडून होत असणाऱ्या या टीकेनंतर संजय राऊत यांनी देखील प्रति उत्तर दिलं आहे. तर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील संजय राऊत यांचं कौतुक केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत या प्रकारावर आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.
https://twitter.com/i/status/1468881567946723328
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले –
“संजय राऊत यांनी काल शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिली. शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खुर्ची देण्याचा विचार करेल. जेव्हा आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभं राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे. तो काय आहे, कोण आहे हेदेखील आपण पाहत नाही. वयोवृद्ध व्यक्ती आली आणि आपल्याला जर त्यांना काय अडचणी आहेत माहिती असेल तर ते करतोच. संजय राऊत यांनी तसं केलं असेल तर त्यांच्यातील माणुसकीचे संस्कार दिसलेत. त्याच्याबद्दल एवढी चर्चा कशासाठी? हे महाराष्ट्रात काय सुरु आहे?,” अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र कशासाठी ओळखला जातो…आदरातिथ्य नावाची काही गोष्ट आहे की नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. “मुख्यमंत्री आल्यानंतर कितीही मोठा मंत्री असला तरी तो उठून उभा राहतो. हा त्या मुख्यमंत्रीपदाचा आदर आहे. शरद पवार या व्यक्तिमत्वाबद्दल, वयाबद्दल, त्यांच्या शारिरीक अस्वस्थेबद्दल ज्यांना माहिती आहे त्यातील संजय राऊत आहेत. त्यांनी तात्काळ खुर्ची आणली आणि दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि नमन करतो,” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1468469913127841793?s=20
नेमकं काय झालं होतं –
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असून 12 खासदारांचं निलंबन करण्यात आल्याने विरोधकांकडून संसदेबाहेर निदर्शनं केली जात आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिथे हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी शरद पवारांसाठी संजय राऊत खुर्ची आणत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा