कामशेतमध्ये पाण्यासाठी महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतीवर संतप्त मोर्चा

“Women in Kamshet raise their voice for water, stage an angry march to the gram panchayat.”

पावसाळा असूनही पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आल्याने कामशेतमधील महिलांचा संताप उसळला आहे. इंद्रायणी कॉलनीमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प असून, अखेर संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. राखी पौर्णिमेसारख्या सणाच्या दिवशीही पाण्याचा थेंब न मिळाल्याने नागरिकांची नाराजी आणखी तीव्र झाली आहे.

मोर्चादरम्यान महिलांनी आपल्या तक्रारी ग्रामपंचायत प्रशासनासमोर मांडल्या. मात्र, यावेळी सरपंच रूपेश गायकवाड आणि ग्रामसेवक धनंजय देशमुख गैरहजर असल्याने लोकांचा रोष अधिकच वाढला. पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे आणि माजी उपसरपंच नीलेश दाभाडे यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत, लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

फक्त इंद्रायणी कॉलनीच नव्हे, तर पंचशील, गरुड आणि देवराम कॉलनीसारख्या इतर भागांमध्येही पाणीपुरवठा अनियमित आहे. काही ठिकाणी तर गढूळ पाणी येत असल्याने साथीचे आजार पसरू लागण्याची भीती व्यक्त होत आहे. काही भागांमध्ये आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

या समस्येबाबत सरपंच रूपेश गायकवाड यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याच्या पंपांमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. “महावितरणकडे अखंड वीजपुरवठ्यासाठी पाठपुरावा सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र, नागरिकांचा आरोप आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे. महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे