मुंबई, २५ ऑक्टोबर २०२०: देशात आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील समजला जातो. या एका मुद्द्यावरून सरकारं पडतात आणि पुन्हा नव्यानं स्थापनही केली जातात. आरक्षण देण्यासाठी नक्की निकष कोणता असावा, यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. जातीच्या आधारे आरक्षण द्यावे की माणसाची आर्थिक स्थिती लक्षात घेता आरक्षण द्यावे? या महत्त्वाच्या विषयावर आता कंगना राणौतनं मतप्रदर्शन केलं आहे.
गरिबीच्या आधारावर आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर कंगनानं जोर दिला आहे. गरिबीच्या आधारवरच नेहमी आरक्षण दिलं पाहिजे, असे कंगनाने ट्विटमध्ये स्पष्टपणे सांगितले. तिच्या दृष्टीने जातीच्या नावावर आरक्षण देणं बरोबर नाही. गरिबीच्या आधारावर नेहमीच आरक्षण दिले जावे. जातीच्या नावावर आरक्षण असू नये. मला माहीत आहे की, राजपूत समाज खूप संकटात सापडला आहे, परंतु ब्राह्मणांची स्थिती पाहून तर खूप वाईट वाटत असल्याची भावना कंगनानं व्यक्त केली आहे.
आता कंगना रनौतने आपल्या ट्विटमध्ये दोन मोठ्या मुद्द्यांवर बोट ठेवलं आहे. एकीकडे त्यांनी गरिबीच्या जोरावर आरक्षण देण्याची वकिली केली आहे, तर दुसरीकडे त्यांनी ब्राह्मणांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटमध्ये कंगनाने ब्राह्मणांचा उल्लेख केला आहे. ५५ टक्के ब्राह्मण हेच गरिबीच्या रेषेखाली आहेत. आरक्षणासंदर्भात कंगनानं यापूर्वीही टीकटिप्पणी केली आहे. प्रत्येक वेळी तिच्या वक्तव्यांवरून मोठा गदारोळ झाला आहे. यावेळीसुद्धा सोशल मीडियावरून तिच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. कंगनाच्या विचारांशी काही जण सहमत आहेत, तर काही जणांनी तिच्यावर टीकासुद्धा केली आहे. कंगनाने आरक्षणाबद्दल तपशीलवार वाचले पाहिजे, असा सल्लाही काही युजर्सनी दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे