Pimpri Chinchwad Green Zonal Office Project: पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे! संत तुकारामनगर येथे लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अत्याधुनिक ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे, हे कार्यालय केवळ एक इमारत नसून, पर्यावरणाची काळजी घेणारी एक ‘हरित इमारत’ (Green Building) असणार आहे, ज्यात सौर ऊर्जा पॅनेलसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश असेल. या प्रकल्पासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच कामासाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.
पिंपरीतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनसमोरील आयसीसी देवी टॉवर शेजारील ‘इंडस्ट्रियल टू रेसिडेन्शियल (I2R)’ अंतर्गत उपलब्ध झालेल्या जागेवर ही देखणी आणि पर्यावरणपूरक इमारत आकाराला येणार आहे. महापालिकेला ३ ऑक्टोबर २०२४ रोजीच या ५२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली होती, तर आयुक्तांनी २८ ऑक्टोबर २०२२ रोजीच इमारत उभारण्यास मान्यता दिली होती. चालू अर्थसंकल्पात यासाठी २ कोटी ५८ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या डिझाइनसाठी ज्योती पानसे असोसिएटस या आर्किटेक्टची ९ जुलै २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी २२ मे २०२४ रोजी आयुक्तांसमोर इमारतीचे सादरीकरण केले होते. १८ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत आयुक्तांनी ही इमारत पूर्णतः हरित असावी आणि सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात यावेत, अशा महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. यामुळे इमारतीचा खर्च ५२ कोटींवरून ६० कोटी रुपयांपर्यंत वाढला असला, तरी महापालिकेने या वाढीव खर्चाला मान्यता दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासकीय पातळीवर या वाढीव खर्चाला मंजुरी दिल्याने, आता लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होऊन इमारतीच्या कामाला वेग येणार आहे. मेट्रो स्टेशनजवळच हे कार्यालय येत असल्याने नागरिकांसाठी ते अधिक सोयीचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे










































