कर्नाटकची पाण्याची गरज भागवण्यासाठी महाराष्ट्राने मदत करावी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

47

मुंबई, १ जून २०२३ : कर्नाटकात सध्या पाण्याची टंचाई भासत असून, यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने मदत करावी. वारणा आणि कोयना नदीतून दोन टीएमसी पाणी सोडण्यात यावे. तसेच उजनी धरणातील भीमानदीतून तीन टीएमसी पाणी कर्नाटकला सोडण्यात यावे. अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पत्रात केली आहे. एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात कर्नाटकातील सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. सध्या कडाक्याचे ऊन आहे. अशात कर्नाटकात पाण्याची गंभीर समस्या आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याचे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.कर्नाटकातील बेळगाव, विजयपुरा, बागलकोट, कलबुर्गी, याडगिरी आणि रायचूर या जिल्ह्यांमध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे. या जिल्ह्यांमध्ये मार्चपासूनच पाण्याची कमतरता जाणवत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्याही अधिक तीव्र होत चालली आहे, असा उल्लेख सिद्धरामय्या यांनी त्यांच्या पत्रात केला आहे.

त्यांनी मान्सून अन् पावसाचा उल्लेखही आपल्या पत्रात केला आहे. मान्सून अजून भारतात दाखल झालेला नाही. पावसाची चिन्हे नाहीत. अशातच कर्नाटकच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाळा आहे. शेतीसाठी, लोकांना घरगुती वापरासाठी आणि जनावरांसाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे. ही समस्या दूर होणे गरजेची आहे, असेही सिद्धरामय्या यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. कर्नाटकातील सध्याची पाण्याची समस्या पाहता महाराष्ट्र सरकारने मदत करावी. भीमा आणि कृष्णा नदीतून पाणी सोडावे, अशी विनंती सिद्धरामय्या यांनी आपल्या पत्रात केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा