जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात लाखो रोपांची होणार लागवड

धुळे, १ जून २०२३ : जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. खानदेशातील वनक्षेत्रात जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात यंदा ४७ लाख रोपांची लागवड होणार आहे. महाराष्ट्रात प्रत्येकवर्षी पावसाळ्यापूर्वी अशा वृक्ष लागवडीचे राज्य सरकारकडून नियोजन केले जाते. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्यावर्षी सुध्दा मोठया प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने वृक्ष लागवडीचे नियोजन सुरू केले आहे. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांमधील वनक्षेत्रामध्ये २९७५ .११ हेक्टर वनक्षेत्रावर सुमारे ४७ लाख ६६ हजार रोपांची लागवड केली जाणार असल्याची माहिती धुळे वन विभागाचे वनरक्षक दिगंबर पगार यांनी दिली. दरवर्षी महाराष्ट्रात राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर रोपांची लागवड केली जाते. यावर्षी खानदेश वासियांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. पावसाळ्यापुर्वी नव विभागाकडून खानदेश विभागासाठी मोठे नियोजन केले आहे.

राज्य सरकारच्या या वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत धुळे वनविभागात ९१६.९१ हेक्टर वनक्षेत्रावर १४ लाख ९४ हजार वृक्षांची लागवड होणार आहे, तर नंदुरबार वनक्षेत्रात ९२४ हेक्टर वर ११ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तसेच मेवासी वनविभाग अर्थात तळोदा वनक्षेत्रामध्ये १७० हेक्टर वनक्षेत्रावर ४ लाख २५ हजार रोपांची लागवड होणार आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव वनविभागामध्ये ३३० हेक्टर क्षेत्रावर ५ लाख २८ हजार झाडे लावली जाणार आहेत. याच जिल्ह्यातील यावल वनक्षेत्रामध्ये ६३५ हेक्टर वनक्षेत्रावर १२ लाख १९ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. धुळे वनवृत्ताच्या प्रादेशिक यंत्रणेमार्फत वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तर सामाजिक वनीकरण विभागामार्फतही वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट हाती घेण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर