काश्मीरमध्ये टळला मोठा दहशतवादी हल्ला, होता पुलवामा सारखा कट

जम्मू काश्मीर, दि. २८ मे २०२०: जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्यासारखा कट रचला असल्याचे उघड झाले आहे. पुलवामाच्या हल्ल्यात सैंट्रो वाहनात आयईडी (इंप्रोवाइज्ड विस्फोटक डिव्हाइस) ठेवण्यात आला होता. परंतू यावेळेस घटनेच्या आधीच हे स्फोटक सापडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. स्फोटक विल्हेवाट पथकाने वेळीच या स्फोटकाला निष्क्रिय केले व पुढील होणारी मोठी दुर्घटना टाळली गेली.

पुलवामा पोलिस, सीआरपीएफ आणि सैन्याने एकत्रित कारवाई करत हे वाहन ओळखले आणि त्यामध्ये आयईडीचे अस्तित्व शोधून काढले. त्यानंतर बॉम्ब विल्हेवाट पथकाला पाचारण करण्यात आले आणि अखेर हा आयईडी स्फोट टाळण्यात आला.

असे सांगितले जात आहे की, एक दहशतवादी स्फोटकांनी भरलेले वाहन घेऊन जात होता. सुरुवातीला झालेला गोळीबारात हा आतंकवादी अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. हे प्रकरण आता एनआयएकडे सोपविण्यात आले आहे. पुलवामा येथील राजपुरा रोडजवळील शादिपुरा येथे वाहन पकडले गेले.

पांढर्‍या सँट्रो कारमध्ये दुचाकी वाहनाची नंबर प्लेट लावण्यात आली होती. या दुचाकी वाहनाची नंबर प्लेट कठुआ मध्ये नोंदणीकृत झालेल्या वाहण्याची होती. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याचा माग काढला, त्यानंतर बॉम्बचा शोध घेण्यात आला. बॉम्ब विल्हेवाट युनिटचे आगमन होण्यापूर्वी आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता.

मागच्या वर्षी पुलवामा येथे जो आतंकवादी हल्ला झाला होता तो हल्ला देखील याच प्रमाणे घडवून आणण्यात आला होता. त्यावेळेस सुद्धा एका चारचाकी वाहनांमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. स्फोटकांनी भरलेली हि गाडी सैनिकांच्या बस वर जाऊन आदळली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात सुमारे ४५ सैनिक शहीद झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा