मुंबई, 6 जुलै 2022: शिंदे गट हा बंडखोर नेत्यांचा गट म्हणूनच प्रसिद्ध आहे. पण आता इतके दिवस गप्प बसलेला हा बंडखोर गट आता मनातली खदखद बोलून दाखवत आहे. याची सुरुवात गुलाबराव पाटील यांनी केली. जिथे लोकं सरपंच पद सोडण्यास तयार होत नाही, तिथे आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी मंत्रीपद सोडले. तब्बल आठ मंत्र्यांनी आम्ही पदं सोडली. हा उठाव आहे. बंड नव्हे असं मत ठामपणे गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच हा आयुष्यातला सगळ्यात मोठा सट्टा आम्ही खेळलो असंही त्यांनी नमूद केलं.
शिवसेनेचा ऱ्हास हा संजय राऊतांमुळे झाला. जर संजय राऊत नसतील आणि जर पुन्हा बोलावले तर आम्ही पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जायला तयार आहोत, असं वक्तव्य संजय राठोड यांनी केलं.
शंभूराज देसाई यांनीदेखील यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या जवळच्याच व्यक्तींनी सेना संपवण्याचा कट केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ते नक्की कोण ते ओळखा, असं मार्मिक इशाराही त्यांनी केला.
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी देखील संजय राऊतांवर टीका केली. संजय राऊतांनी नक्की कुणाची सुपारी घेतली, हे त्यांनाच माहित. मातोश्री ही बाळासाहेबांची असून उद्धव ठाकरे यांनी प्रति मातोश्री तयार केली आहे. ती आठ मजली असून ती चढून जाणे शक्य होत नाही, असंही भरत गोगावले यांनी सांगितले.
त्यामुळे आता उद्घव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शिवसेनेचा होणारा ऱ्हास आता थांबवण्यासाठी नक्कीच उद्घव ठाकरेंनी आक्रमक होण्याची गरज आहे, हेच चित्र निर्माण झालं आहे. आता ठाकरेंची लढाई ही अस्तित्वासाठीची लढाई आहे, हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस