किल्ल्यांनी जपला…ऐतिहासिक वारसा

वर्धनगड

“सह्याद्रीची एक रांग मानदेशांतून फिरली आहे. तिचे नाव महादेव डोंगर रांग. त्या रांगेवर एक भांडलीकुंडल नावाचा एक फाटा आहे. त्यावर कोरेगाव आणि खटाव तालुक्याच्या सीमेवर साताऱ्याच्या ईशान्य बाजूस १७किमी अंतरावर हा किल्ला बांधलेला आहे. किल्ल्याला लागून असलेल्या लालगुण व रामेश्वर या डोंगर रांगाहून किल्ल्यावर तोफांचा मारा करता येत असे. असे इतिहास अभ्यासकानी म्हटले आहे.”

ज्या दिवशी मोगलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने साताऱ्यातील किल्ल्यांकडे आपले लक्ष्य वळवले. मोगल सरदार फत्तेउल्लाहखान याने सल्ला दिला की, बादशहानी खटावला छावणी करावं. म्हणजे पावसाळ्यात चंदन, वंदन व नांदगीरी हे किल्ले जिंकून घेता येतील. त्यावर औरंगजेबाने यासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर ८जूनला फत्ते उल्लाह खान आपल्यासोबत काही सैन्य घेऊन खटाव येथे बंदोबस्तासाठी गेला. सर्वात अगोदर त्याने खटाव येथील ठाणे जिंकले. त्यात मराठ्यांचा पराभव झाला. यानंतर मोगलांची टीम खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली. त्यामुळे वर्धनगडाला आज ना उद्या हे सैन्य वेढा घालणार हे निश्चित होते. त्यामुळे मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वाड्या वस्त्यांतील लोकांना आक्रमणाची आगाऊ कल्पना दिली होती. तसेच ज्यांना शक्य होते.त्यांनी आपल्या बायका मुलांना किल्ल्यात नेले.

वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला वकील फत्तेउल्लाहखानाकडे पाठवला.त्यात त्यांनी असा निरोप पाठवला की, किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे. त्याला खान लगेच तयार झाला. परंतु वकिलकडून हा निरोप पाठवणे फक्त वेळकाढूपणा होता.कारण हल्ला पुढे ढकलणे हा त्या मागचा उद्देश होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्या मागील हेतू होता.

फत्तेउलखान वाट पहात राहिला की, मराठा सरदार आज येईल, उद्या येईल.परंतु एकही मराठा सरदार त्याच्याकडे फिरकलाही नाही. मराठ्यांचा हा खेळ खानाच्या लक्षात आला. त्यानंतर १३जूनला त्याने वर्धनगडावर हल्ला चढवला. त्या हल्ल्याला मराठ्यांनी चोख प्रतिउत्तर दिले. पण त्यात अनेक मराठे मारले गेले. मोगलांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या झोपड्या जाळून टाकल्या. या लढाईत मराठ्यांनी अखेर १९जून रोजी रात्री वर्धनगड सोडला.

त्यानंतर “मीर ए सामान” याखात्याचा व्यवस्थापक २२जूनला वर्धनगडावरील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला.त्यात त्याला सहाशे ७५मन धान्य, चाळीस मन सोरा, बंदुकीची दारू, सहा मोठ्या तोफा व जांबुरक असा माल जप्त केला.
त्याच दिवशी औरंगजेबाने वर्धनगडाच्या नाव बदलून “साडीकगड”असे ठेवले. औरंगजेबाची पाठ फिरताच हा किल्ला मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. मराठ्यांनी पुन्हा नाव बदलून “वर्धनगड” केले.

वर्धनगडाचा इतिहास मोठा आहे. त्यात अनेक मराठा सैन्यांनी बलिदान दिलेले आहे. त्यामुळे वर्धनगड हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे.


-प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा