नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर २०२०: केंद्रशासित प्रदेश लडाखची राजधानी लेह हे ठिकाण चीनमधील दर्शविण्याबाबत भारताने ट्विटरला कडक इशारा दिला आहे. सरकारने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांना संवेदनशीलतेने वागण्यास सांगितले आहे. यावर ट्विटरने म्हटले आहे की आम्ही भारत सरकार बरोबर काम करण्यास वचनबद्ध आहोत. यात सहभागी असलेल्या भावनांचा आम्ही आदर करतो.
या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारचे आयटी सचिव अजय सहनी यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांना पत्र लिहिले. ट्विटरद्वारे भारताच्या नकाशाचा दुरुपयोग केल्याबद्दल केंद्र सरकारने आक्षेप घेतला. हे अचंबित करणारे होते की १८ ऑक्टोबर रोजी ट्विटरने लेहचे जिओ टॅगचे स्थान त्यांच्या व्यासपीठावर चीनमध्ये दर्शविले.
आयटी सचिव अजय सहनी म्हणाले की, लेह हा केंद्रशासित प्रदेश लडाखचा भाग आहे. लडाख आणि जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य भाग आहेत, जे भारतीय राज्यघटनेने शासित केले आहेत. सोशल साइटने भारतीय लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा अपमान मान्य होणार नाही आणि हे कायद्याचेही उल्लंघन आहे.
ट्विटरला कडक इशारा देताना आयटी सेक्रेटरी अजय सहनी यांनी असे लिहिले की अशा प्रकारच्या कृतींमुळे केवळ ट्विटरची विश्वासार्हताच बाधित होत नाही तर ट्विटरच्या तटस्थतेवर आणि निःपक्षपातीतेवरही प्रश्न उपस्थित होतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे