ओतूरमध्ये कांद्याच्या शेतात झोपलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; महिला गंभीर जखमी

ओतूर, १५ मार्च २०२३ : ओतूर हद्दीतील उंब्रज पांध शिवारात शेतकरी भगवान महादेव तांबे यांच्या शेतातील कांदा काढण्यासाठी आलेल्या आणि रात्रीच्या सुमारास त्याच शेतात झोपलेल्या शेतमजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. ही घटना १५ मार्चला पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील काही शेतमजूर कांदा काढणीसाठी ओतूर परिसरात आलेले आहेत.

त्या मजूर टोळ्यापैकी रविता उकार किराडे (वय २०) ही महिला कांद्याच्या शेतात झोपली होती. दरम्यान, अतिवेगाने एक बिबट्या शिकारीचा पाठलाग करीत असताना बिबट्याकडून शिकार निसटली; मात्र बिबट्याची नेमकी झेप त्या महिलेच्या डोक्यावरच पडली. त्यात ती महिला गंभीर जखमी झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गीते, वनरक्षक पी. के. खोकले, वनसेवक किसान केदार हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

जखमी महिलेस तातडीने ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्रथोमोपचार केले व पुढील उपचारासाठी महिलेस औंध, पुणे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ओतूर व परिसरात बिबट्यांचा वाढता वावर ही एक चिंतेची बाब बनली आहे. नागरिकांनी रात्रीच्या सुमारास विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. घटनेनंतर लगलीच उंब्रज पांध परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा