नाशिक, दि.२६ एप्रिल २०२० : नाशिक शहरालगत असलेल्या नाशिकरोडच्या पुर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. कधी शहरी भागात तर कधी ग्रामीण भागात बिबट्याचे नित्य दर्शन नागरिकांना होत आहे.
मागील आठवड्यात हिंगणवेढे इथं पहाटेच्या सुमारास एका बालकावर हल्ला करून बिबट्या पसार झाला होता. या घटनेनंतर जखोरी आणि शिंदे पळसे या ठिकाणी सलग दोन दिवस नागरिकांना बिबट्या दिसला होता. यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने अनुक्रमे जाखोरी आणि शिंदे पळसे या दोन ठिकाणी पिंजरा लावला होता.
शनिवारी (दि.२५) रोजी रात्री पळसे शिवारात बिबट्या पिंजऱ्यात अडकला मात्र काही वेळातच तो फरार झाला. पिंजऱ्यात अडकल्यानंतर बिबट्या बिथरला आणि त्याने जोरात शटरला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की झापड चे कुलूप तुटल्याने पळसे इथं जेरबंद झालेला बिबट्या फरार झाला आहे.
तर जाखोरी येथे लावलेल्या पिंजऱ्यात याच रात्री दुसरा एक बिबट्या अडकला आहे. हा नर जातीचा बिबट्या असून तो आता वन विभागाच्या रोप वाटिका इथं जेरबंद आहे. त्याची तपासणी करून त्याला काही दिवसांत जंगलात सोडण्यात येणार आहे. नाशिकरोड, शिंदे पळसे या भागात बिबट्यांचा मुक्त वावर मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिक भयभीत झाले आहे.
बिबट्यांना मेटल चिप बसविण्याची गरज।
आता पर्यंत नाशिकच्या वनविभागाने अनेक बिबट्यांना पकडले आहे. सर्व बिबट्यांची तपासणी करून त्यांना जंगलात देखील सोडून दिले आहे. मात्र पकडलेल्या बिबट्यांना मेटल चिप बसवण्याची आवश्यकता असल्याचे वन परिक्षेत्र अधीकारी विवेक भदाणे यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर
बातम्या चांगल्या व सविस्तर आहे.
वाचायला आवडल्या .