ओडिशा रेल्वे अपघातावर एलआयसीचा मोठा निर्णय, कोरोमंडल रेल्वे अपघातग्रस्तांना दावे करणे झाले सोपे

बलासोर, ४ जुन २०२३: देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन दुर्घटनेतील बळी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने मोठे पाऊल उचलले आहे. एलआयसीने या अपघातातील पीडितांसाठी विमा पॉलिसीचा दावा करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे.

एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी शनिवारी एक निवेदन जारी केले. यामध्ये एलआयसीने क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत रेल्वे अपघातातील पीडितांना विविध प्रकारची मदत जाहीर केली आहे. एलआयसीच्या विधानानुसार, रेल्वे अपघातातील पीडितांना जास्त अडचणी येऊ नयेत, म्हणून त्यांच्या एलआयसीच्या विमा पॉलिसी, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पॉलिसी आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पॉलिसीची दावा प्रक्रिया सुलभ केली जात आहे.

आता रेल्वे, पोलीस, कोणतेही राज्य सरकार आणि कोणत्याही केंद्रीय विभागाने जारी केलेली मृतांची यादी अपघातग्रस्तांच्या विम्याचा दावा करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र मानले जाईल. म्हणजेच, या मृतांच्या नातेवाईकांना विम्याचा दावा करण्यासाठी नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागणार नाही.

इतकंच नाही तर कोरोमंडल ट्रेन दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी एलआयसीने विशेष हेल्प डेस्क आणि कॉल सेंटर सुरू केले आहे. एलआयसीच्या विभागीय आणि शाखा स्तरावरील कार्यालयात दाव्याशी संबंधित चौकशीचे निराकरण केले जाईल. त्याचबरोबर दाव्यासाठी अर्ज करणाऱ्या नातेवाइकांना पूर्ण मदत केली जाईल. एवढेच नाही तर सर्व विमाधारकांपर्यंत पोहोचून क्लेम सेटलमेंट लवकर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा