साताऱ्याच्या फलटणमध्ये रंगला साहित्यिक संवाद

फलटण, सातारा ३० जुलै २०२३ : श्रावणधारा, गार गार वारा, हिरवा निसर्ग सारा, आजुबाजुला सर्व वनौषधी अन नक्षत्र बनात रंगला साहित्यिक संवाद.
आनंदी जीवन जगण्यासाठी साहित्य फार महत्त्वाचे आहे. साहित्य जीवनाला दिशा देते, त्यामुळेच मानवी जीवनात साहित्याला विशेष महत्व आहे. साहित्यसंदर्भात साहित्यिकांची चर्चा व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी, कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी २०२३ पासून, सर्व फलटणकर साहित्यिक एकत्र येऊन दर महिन्याच्या २७ तारखेला साहित्यिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.

नाना नानी पार्क फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या संवादाचे आयोजन केले होते. साहित्यिक संवाद कार्यक्रमाचे संयोजक, निवेदक , माणदेशी साहित्यिक व साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात साहित्यिक संवाद याची भूमिका स्पष्ट केली.

नव्याने जोडल्या जाणार्‍या साहित्यिकांनी दर महिन्याच्या २७ तारखेला साहित्यिक संवादाचा मनसोक्त आनंद लुटावा व अधिक जोमाने साहित्य निर्मिती करून समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे मत आवळे यांनी व्यक्त केले. पावसा तुझ्याव माझा भरोसा नाही ही कविता सादर केली. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रविंद्र बेडकिहाळ यांनी साहित्यिकांनी लिखाण करताना स्पष्टपणे लिखाण करून आजुबाजुला घडणार्‍या घडामोडी यावर प्रकाश टाकावा व समाजमन जागृत करावे असे सांगून मणिपूर येथे घडलेल्या घटनेवर परखड मत व्यक्त केले.

यावेळी रानकवी राहुल निकम, कवयित्री आशा दळवी, कवी अतुल चव्हाण, नवकवयित्री कु. दामीणी ठिगळे, नवकवयित्री कु. अस्मिता खोपडे, बालकवी वृषभ भोसले यांनी वसुंधरेचा जागर करू या, झाड,मातीत सारा गाव गेला, उन्हाड वारा, लाडाच पाखरू,दुःखातला पाऊस, शब्दालंकार, एक होत माळीण , आठवणीतील एक दिवस, शब्दांचा डाव अशा विविधांगी कविता सादर करून साहित्यिक संवादात रंगत आणली. प्रा.विक्रम आपटे यांनी कल्पना रम्यता या गमतीशीर लेखाचे वाचन करून कल्पनाशक्ति जागृत केली. यावेळी कृष्णात बोबडे, अक्षय लावंड, सौ.कोमल खोपडे, राजेश पवार तसेच साहित्यिक व साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा