Lonavala railway overbridge construction: लोणावळा शहरातील रखडलेल्या भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला आता गती मिळणार आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी (५ जून २०२५) लोणावळा शहराला भेट देऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना येत्या सोमवारपासून (९ जून २०२५) हे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे लोणावळ्यातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
या महत्त्वाच्या दौऱ्यात पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि आमदार सुनील शेळके उपस्थित होते. लोणावळा नगर परिषदेत झालेल्या बैठकीत शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये लोणावळा भाजी मंडईची दुरुस्ती आणि व्यवस्थापन, खंडाळा माध्यमिक शाळेच्या जागेचा वापर, रिक्षा व टॅक्सी संघटनांच्या मागण्या, शहरात नवीन पर्यटन केंद्र विकसित करण्याची गरज, वाहतूक कोंडीवर उपाययोजना आणि पर्यटकांची सुरक्षितता यांसारख्या मुद्द्यांवर गंभीर विचारमंथन झाले.
या आढावा बैठकीत प्रस्तावित ‘ग्लास स्काय वॉक’ प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होण्यावर भर देण्यास अधिकाऱ्यांना सांगितले. या दौऱ्याला लोणावळा शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, रिक्षा व टॅक्सी संघटना, भाजी मंडई व्यापारी, पथ विक्रेते आणि टपरी संघटनांचे पदाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे लोणावळ्यातील विकासकामांना निश्चितच वेग येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे