महाविकास आघाडीची मुंबईत वाय.बी.चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक, निवडणूक रणनीतीवर चर्चा

मुंबई, २९ जुलै २०२३ : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत.सध्या राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन चार ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. या अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्ताराला जास्त महत्त्व आहे. कारण शिंदे गटाच्या कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे देशात पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत.या दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काही महत्त्वाच्या हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे.

सध्याचे चित्र पाहता राज्यातील राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे. कारण गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेते असलेलेले अजित पवार हे त्यांच्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांच्याकडे अर्थ खाते आहे. अजित पवार यांचे सत्तेत सहभागी होणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पटलेले नाही. त्यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. शरद पवार यांचा गट हा महाविकास आघाडीत आहे.ते भाजपच्या विरोधात आहेत. भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तेतून पायउतार करावे, अशी या गटाची भूमिका आहे. याचसाठी महत्त्वाची बैठक पार पडली.

शरद पवार आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात भाजपचा सामना कसा करायचा याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे आगामी काळात काय रणनीती आखावी याबाबत या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे दौरे सुरु होणार असल्याचे सांगितले. पण नेमके काय होणार आहे? याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टनंतर महाविकास आघाडीचे तीन प्रमुख नेते एकत्र सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत सभेचा पुढचा अजेंडा ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा