महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) आता बोगस मजुरांना पूर्णविराम मिळणार आहे! यापुढे मजुरांची पारंपरिक हजेरी पद्धत बंद होणार असून, त्यांची उपस्थिती आता थेट ‘फेस ऑथेंटिकेशन’ (Face Authentication) प्रणालीद्वारे नोंदवली जाईल. पारदर्शकतेसाठी केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, या नव्या निर्णयानुसार, मनरेगातील सर्व जॉब कार्डधारकांना ‘फेस ई-केवायसी’ (Face e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या अत्याधुनिक फेस-रीडिंग तंत्रज्ञानामुळे मनरेगा योजनेतील गैरव्यवहार आणि खोट्या हजेरीला प्रभावीपणे आळा बसेल. फेस ई-केवायसी प्रक्रिया आता सर्व जॉब कार्डधारकांसाठी सक्तीची असून, या ऑनलाइन ओळख पडताळणी प्रक्रियेत डिव्हाइसच्या कॅमेऱ्याद्वारे थेट ‘लाइव्ह सेल्फी’ घेऊन तो रेकॉर्डमधील आधार कार्डाच्या फोटोसोबत जुळवला जाईल.
यामुळे कामाच्या ठिकाणी उपस्थितीची नोंदणी अधिक पारदर्शक आणि अचूक होईल, परिणामी मजुरांना त्यांचे वेतन वेळेवर मिळण्यास मोठी मदत होईल.
महत्त्वाची सूचना
ही फेस ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास, मजुरांना मनरेगाचे काम आणि वेळेवर वेतन मिळणे या दोन्ही बाबतीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मजुरांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे अनिवार्य आहे.
ई-केवायसी कुठे आणि कशी करायची?
यासाठी मजुरांनी तातडीने ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामरोजगार सहायकांशी संपर्क साधावा. त्यांच्या मदतीने, आधार कार्डाच्या आधारे आपल्या चेहऱ्याच्या स्कॅनद्वारे (फेस रीडिंग) ही ओळख पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. उपस्थिती आणि मजुरी देयकांमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे














































