सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार, रस्त्यांच्या दिशादर्शक फलकावर जमाना गावाच्या ऐवजी जपान नावाचा उल्लेख

नंदूरबार, २ ऑगस्ट २०२३ : नंदूरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बांधकाम विभागाकडून नवीन रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आला आहेत. या दिशादर्शक फलकामध्ये नंदुरबार जिल्ह्यात जपान नावाचे गाव असल्याचा फलकावर उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिक संभ्रमात पडले आहेत. जपान आपल्या जिल्ह्यात आहे आणि आपल्याला माहीत कसे नाही? असा प्रश्न या लोकांना पडला आहे. साता समुद्रपार असलेला जपान हा देश नंदुरबार जिल्ह्यात कसा आला? असा सवाल या लोकांना पडला आहे. त्यामुळे जपान हे गाव कुठे आहे याचा शोध ते घेत आहेत?

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही चूक झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यात जपान हे गाव नसून जमाना हे गाव आहे. मात्र बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे गावाचे नाव चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने लवकरात लवकर संबंधित फलकावर दुरुस्ती करावा. नवीन फलक लावावा, अशी मागणी आता प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, बांधकाम विभागाने चक्क गावाचे नाव बदलून जपान ठेवल्याने लोकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. पंचक्रोशीतील लोक हा फलक पाहण्यासााठी येत आहेत. तसेच या फलकासोबतचा एक सेल्फीही घेत आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घोडचुकीवर दिलखुलास हसून शेरेबाजी होत आहे.

या दिशादर्शक फलकावर एकूण सहा गावांची नावे लिहिली आहेत. डाब, तोडीकुंड, चिवलउतार, खुंटगव्हाण, ओरपाफाटा आणि जपान असे या फलकावर लिहिण्यात आले आहे. चार रस्त्यांच्या जवळच हा दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे जाणारे येणारे लोक आवर्जून थांबून बोर्ड न्याहाळत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा