कार्यक्रमात गोंधळ झाल्यास मी कार्यक्रम घेणार नाही, गौतमी पाटील हिचा सर्वात मोठा निर्णय

अहमदनगर, २ ऑगस्ट २०२३ : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी पुन्हा गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या नागापूर येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. हुल्लडबाजांनी एवढा गोंधळ घातला की त्यांनी थेट दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते.

या गोंधळामुळे गौतमी पाटीलला आपला कार्यक्रम अर्ध्यावरच बंद करावा लागला. यापुढे आयोजकांनी नीट, व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा गौतमी पाटीलने दिला आहे. गोंधळ झाल्यास मी कार्यक्रम घेणार नाही, अशी भूमिका गौतमी पाटील हिने जाहीर केली.

नागापूरच्या सरपंचांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही हुल्लडबाजांनी धिंगाणा घातला. विशेष म्हणजे एमआयडीसी पोलीस आणि खाजगी बाउन्सर त्या ठिकाणी असताना त्यांच्यासमोर हुल्लडबाजांनी धिंगाणा घातला. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तरुणांच्या हुल्लडबाजी मुळे अनेकदा असे प्रसंग ओढावतात त्यामुळे आयोजकांनीही कार्यक्रमावेळी दक्षता घेणे गरजेचे आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा