पुरंदर, दि. २४ सप्टेंबर २०२०: महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी करीत महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जेजुरीत आंदोलन करण्यात आले. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
राज्यातील भाविकांकडूनसुद्धा खंडोबा मंदिर लवकर सुरु करा अशी मोठया प्रमाणात मागणी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडोबाचे मंदिर १८ मार्चपासून बंद असल्याने जेजुरीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. येथील सर्व जाती-धर्माच्या लोकांची उपजीविका येथे येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. लहान मोठ्या व्यावसायिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे तातडीने खंडोबा मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या, भाजीमार्केट, दुकाने, मद्यविक्री सुरु केली असताना मंदिरेच बंद का? असा सवाल भाविक करत आहेत.
राज्यात असणाऱ्या तीर्थक्षेत्रातील शेकडो मंदिरे बंद आहेत. भाविकांना तेथील देवाचे दर्शन होत नसल्याने आता सर्वच स्तरांतून ही मंदिरे उघडण्याची शासनाकडे मागणी होत आहे. यावेळी मनसेच्या आंदोलनाला नेत्या रुपाली ठोंबरे, सुधाकर पाटसकर, अविनाश बारभाई, युवराज जगताप, प्रवीण जगताप , मल्हार कुढळकर, पोपट खोमणे, भाऊ शेवाळे, भाजपच्या आलका शिंदे, गणेश भोसले, संतोष भुजबळ आदी उपस्थित होते. गडाच्या पहिल्या पायरीवर यावेळी भंडारा उधळून तळी भंडार सुद्धा करण्यात आला. शासनाने दहा दिवसांत मंदिर न उघडण्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे