चांद्रयान-३च्या सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहेत, उद्याच्या सॉफ्ट लँडिंग आधी इस्रोच्या प्रमुखांनी दिली अपडेट

नवी दिल्ली, २२ ऑगस्ट २०२३ : भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम आता अंतिम टप्प्यावर आहे. चांद्रयान-३ च्या लँडिंगसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सगळ्या देशाला उद्या संध्याकाळची प्रतिक्षा आहे. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ चांद्रभूमीला स्पर्श करेल. चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोने काटेकोर नियोजन करुन सर्व आवश्यक काळजी घेतली आहे. अत्यंत छोट्यात-छोट्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करुन त्याचा मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. तरीही प्रत्येक देशवासियाच्या मनामध्ये थोडी हुरहूर, चिंता आहे.

२०१९ साली चांद्रयान-२ मिशनमध्ये अगदी शेवटच्या क्षणी लँडिंगला काही मिनिट बाकी असताना गडबड झाली होती. दोनच दिवसांपूर्वी रशियाच्या लूना-25 यानाच सुद्धा क्रॅश लँडिंग झालं होतं. त्यामुळे उत्सुकता आणि चिंता या दोन्ही भावना असणं स्वाभाविक आहे. जे ठरवलय तसं घडावं, यासाठी इस्रोचे वैज्ञानिक वारंवार मिशन संदर्भात प्रत्येक गोष्टीची पडताळणी करत आहेत. इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ यांनी यशस्वी सॉ़फ्ट लँडिंगचा विश्वास व्यक्त केला आहे. मिशनची तयारी सुरु असल्यापासूनच आम्हाला विश्वास होता. चंद्रावरच्या आतापर्यंतच्या प्रवासात प्रॉप्लशन मॉड्युल आणि लँडर मॉड्युलने कुठल्याही अडचणीशिवाय प्रवास केला आहे. या टप्प्यापर्यंत तरी सर्वकाही व्यवस्थित असल्याचा आम्हाला विश्वास आहे. अजूनपर्यंत तरी कुठल्या आपत्तीचा सामना करावा लागलेला नाही. आम्ही सर्व तयारी केली आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

यासोबतच इस्रोने चंद्राचे नवीन फोटो शेअर केले आहेत, जे चांद्रयान-३ ने क्लिक केले होते. चंद्रयानाने लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC) च्या मदतीने चंद्रावरून ७० किमी अंतरावरून ही छायाचित्रे घेतली आहेत. चांद्रयान-३ सध्या चंद्रावर उतरण्यासाठी नेमके ठिकाण शोधत आहे. हे लँडर २५ किमी उंचीवरून उतरवले जाईल.

चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागावर चांद्रयान-३ चं विक्रम लँडर उतरणार आहे. चांद्रयान-३ च्या चंद्र मोहिमेच्या थेट प्रक्षेपणाच्या रिअल-टाइम अपडेटसाठी इस्रोने खास तयारी केली आहे. ज्यामुळे घरबसल्या तुम्हाला चांद्रयान-३ चा चंद्रावर उतरण्याचा प्रवास पाहता येणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. याच थेट प्रसारण केलं जाणार आहे. इस्रोने यासंदर्भात माहिती दिली आहे. लाईव्ह प्रक्षेपण MOX/ISTRAC कडून २३ ऑगस्ट रोजू १७:२० वाजता सुरू होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा