मुंबई, २७ जुलै २०२३ : बरोबर एक महिन्यापूर्वी मान्सून राज्यात दाखल झाला. त्यानंतर कोकणात आणि मुंबई पट्ट्यात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला. पावसाने मुसळधार स्वरूप धारण केल्यावर पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचेही पाहायला मिळाले. यावरून नालेसफाई पूर्ण झाली नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असे आरोप करण्यात आले.
जसजसा पावसाचा जोर वाढत गेला, तसा रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. अंधेरी, मालाड, बोरीवली, दहिसर, कुलाबा, दादर, सायन सह अनेक भागात सखल भागात पाणी साचले होते. तर काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते.अशावेळी रस्ते मार्गाने आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या चकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन वरून बाहेर पडल्यावर घरी जाताना अंडरपास रोडच्या पुलाखाली साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत होता.
मागील दोन आठवड्यापासून वरुणराजा धुवांधार कोसळत आहे. मागील चार दिवसात तर अती मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसू लागले आहे. आता मुंबईतील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस माऊली थोरवे यांच्या नेतृत्वाखाली मानखुर्द परिसरात मनसैनिकांकडून आंदोलन करण्यात आले.
हातात पोस्टर, कागदाची बोट आणि खेळण्यातील शीप घेऊन हे आंदोलन केरण्यात आले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची मनसे कार्यकर्त्यांकडून दखल घेऊन आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवले नाही तर, आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा मनसैनिकांनी राज्य सरकारला दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर