चोल सम्राटांचे भव्य पुतळे उभारणार पंतप्रधान मोदी; जाणून घ्या चोल सम्राटांचे योगदान…

Chola Dynasty
चोल सम्राटांचे भव्य पुतळे उभारणार पंतप्रधान मोदी;

Chola Dynasty: भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक इतिहासात चोल साम्राज्याचं स्थान अनन्यसाधारण आहे. सध्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आयोजित आदि तिरुवाथिरै उत्सवामुळे चोल साम्राज्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. हा उत्सव राजेंद्र चोल‑I यांच्या दक्षिण‑आशियातील समुद्री मोहिमेच्या 1,000 व्या वर्षपूर्तीनिमित्त साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या निमित्ताने चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाला, त्यांच्या सांस्कृतिक योगदानाला आणि नयनार भक्ती परंपरेला उजाळा मिळत आहे आणि याचं मौल्यवान काळात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 27 जुलै रोजी थिरुवथिरै (आर्द्रा) नक्षत्राच्या दिवशी गंगाईकोंडा चोलापुरममधील ब्रिहदीश्वर मंदिराला भेट दिली, पूजा-अर्चना केली आणि चोल साम्राज्याच्या गौरवशाली वारशाला आदरांजली अर्पण केली. त्यांनी या ऐतिहासिक मंदिरात ‘पूरणा कुंभम’ परंपरेनुसार स्वागत स्वीकारले त्यासोबतच चोल सम्राटांचे भव्य पुतळे उभारणार असल्याची घोषणा ही केली. चला तर मग जाणून घेऊयात या उत्सवाचा, संस्कृतीचा आणि या चोल साम्राज्याचा वारसा…

आदि तिरुवाथिरै उत्सव; नटराज आणि नयनार भक्ती:
आदि तिरुवाथिरै हा तमिळ महिन्यात (जुलै-ऑगस्ट) तिरुवाथिरै (आर्द्रा) नक्षत्राच्या दिवशी साजरा होणारा एक पवित्र उत्सव आहे. हा उत्सव भगवान शंकरांच्या नटराज रूपाला समर्पित आहे, जे सृष्टीच्या नृत्यशीलतेचं आणि सृजनशीलतेचं प्रतीक आहे. याच उत्सवात शैव भक्ती परंपरेतील 63 नयनार संतकवींच्या कार्याचा गौरव केला जातो. सहाव्या ते आठव्या शतकांदरम्यान कार्यरत असलेल्या या संतकवींनी भगवान शिवाच्या भक्तीपर स्तुतीरचना लिहिल्या, ज्या तिरुमुरई या शैव काव्यग्रंथात संकलित आहेत. या रचनांनी तमिळ भक्ती साहित्याला समृद्ध केलं आणि शैव परंपरेला नवं वैभव प्राप्त करून दिलं.

Chola Dynasty Nataraja statue

चोल सम्राट राजराज चोल-I आणि राजेंद्र चोल-I यांनी या नयनार संतांना आश्रय देऊन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिलं. त्यांनी भव्य मंदिरांची निर्मिती केली आणि भक्ती साहित्याला चालना दिली. आदि तिरुवाथिरै उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, चोल साम्राज्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक योगदानाचं स्मरण करणारा उत्सव आहे.

चोल साम्राज्य; एक ऐतिहासिक झेप:

चोल साम्राज्य (इ.स. 9वं ते 13वं शतक) हे दक्षिण भारतातील सर्वात प्रभावशाली साम्राज्यांपैकी एक होतं. तंजावूर येथील राजधानीसह चोलांनी प्रशासकीय, सांस्कृतिक आणि सैन्यदृष्ट्या अभूतपूर्व कामगिरी केली. राजराज चोल-I आणि त्यांचा पुत्र राजेंद्र चोल-I यांच्या कारकिर्दीत चोल साम्राज्याने आपला विस्तार आणि प्रभाव दक्षिण-आशियापर्यंत वाढवला.

समुद्री मोहिमा आणि वैभव:
राजेंद्र चोल-I यांनी इ.स. 1025 मध्ये श्रीविजय साम्राज्यावर (आताचा इंडोनेशिया, मलेशिया) भारतातील पहिली परदेशी नौदल मोहीम चालवली. ही मोहीम चोल साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याचं आणि व्यापारी प्रभावाचं प्रतीक होती. दक्षिण-आशियातील देशांशी आणि चीनशी सागरमार्गाने स्थापित झालेले व्यापारी संबंध चोल अर्थव्यवस्थेची ताकद दर्शवतात. या मोहिमांनी चोलांना आंतरराष्ट्रीय व्यापारात अग्रणी स्थान मिळवून दिलं.

प्रशासकीय आणि सांस्कृतिक योगदान:

चोल साम्राज्य आपल्या उत्कृष्ट प्रशासकीय व्यवस्थेसाठी ओळखलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्था जसे की सबा, उर आणि नाडू यांनी गावपातळीवर स्वायत्तता आणि कार्यक्षमता सुनिश्चित केली. यामुळे प्रशासन लोकाभिमुख आणि प्रभावी राहिलं.

सांस्कृतिकदृष्ट्या, चोलांनी कला, स्थापत्य आणि साहित्य यांना प्रचंड प्रोत्साहन दिलं. तंजावूर येथील बृहदीश्वर मंदिर (UNESCO जागतिक वारसा स्थळ) हे चोल स्थापत्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. या मंदिराची भव्यता, नक्षीकाम आणि स्थापत्यकौशल्य आजही अभ्यासकांना थक्क करतं. चोलांनी ब्राँझ शिल्पकलेलाही प्रोत्साहन दिलं, ज्यामुळे नटराजाच्या मूर्तींसारख्या अप्रतिम कलाकृतींची निर्मिती झाली. तमिळ भक्ती साहित्याचा विकास हा चोल कालखंडातील आणखी एक महत्त्वाचा वारसा आहे.

बृहदीश्वर मंदिर; चोल स्थापत्याचं शिखर:

तंजावूरमधील बृहदीश्वर मंदिर हे राजराज चोल-I यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी आहे. 1010 मध्ये पूर्ण झालेलं हे मंदिर द्रविड स्थापत्यशैलीचं उत्तम उदाहरण आहे. मंदिराचा 66 मीटर उंच विमान (गोपुरम) आणि त्यावरील नक्षीकाम चोलांच्या स्थापत्यकौशल्याची साक्ष देतात. मंदिरातील भित्तीचित्रं आणि शिल्पं चोल कालखंडातील कला आणि धर्म यांचं अपूर्व संगम दर्शवतात.

चोलांचा वारसा आणि आजची प्रासंगिकता:
आज आदि तिरुवाथिरै उत्सवाच्या निमित्ताने चोल साम्राज्याचा वारसा पुन्हा एकदा जागवला जात आहे. चोलांनी केवळ सैन्य आणि व्यापारातच यश मिळवलं नाही, तर त्यांनी भारतीय संस्कृतीला समृद्ध करणाऱ्या कला, साहित्य आणि धर्माला प्रोत्साहन दिलं. नयनार संतांचं भक्ती साहित्य आणि चोलांचं मंदिर स्थापत्य यांनी तमिळ संस्कृतीला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली.

सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेला हा उत्सव चोल साम्राज्याच्या योगदानाला केवळ स्मरण करत नाही, तर आजच्या पिढीला त्यांच्या गौरवशाली इतिहासाशी जोडण्याचं काम करतो. चोलांचा हा वारसा आपल्याला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडतो आणि आपल्या इतिहासातील वैभवाची आठवण करून देतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी; प्रज्ञा शिंदे