मोशी कचरा डेपो दुर्घटना: सुप्रिया सुळे यांचा तीव्र संताप, जखमींची भेट घेत प्रशासनावर डागली तोफ!

पुणे:मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी रात्री तातडीने ‘साईनाथ’ रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. “हा केवळ अपघात नसून शासकीय आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचा पराकोटीचा नमुना आहे. या बेजबाबदारपणामुळे ९ निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे,” अशा शब्दांत सुळे यांनी प्रशासनावर तीव्र हल्लाबोल केला.

डॉक्टरांना दिल्या सूचना : सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कामगारांशी संवाद साधला. यावेळी मृत्यूच्या दाढेतून बचावलेल्या कामगारांनी दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा थरारक अनुभव त्यांना सांगितला. सुळे यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून जखमींवर तातडीने आणि सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, जखमींच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

“मोशी कचरा डेपोतील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या निष्काळजीपणामुळे ज्या ९ कामगारांचा बळी गेला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. पण केवळ श्रद्धांजली वाहून चालणार नाही, तर दोषींना जेल झालीच पाहिजे.”

सुप्रिया सुळे, खासदार

घनकचरा व्यवस्थापनावर उपस्थित केले गंभीर प्रश्नया दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मोठ्या शहरांमधील कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर समस्येकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. “मोठ्या शहरांतील घनकचरा व्यवस्थापन आणि त्याच्या पुनर्वापरासाठी (Recycling) राज्य सरकारने आतातरी एक शास्त्रोक्त आणि कालबद्ध धोरण निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.

भविष्यात अशा मानवनिर्मित दुर्घटना टाळायच्या असतील, तर शासनाने हा विषय गांभीर्याने हाताळायला हवा,” असा सल्लाही त्यांनी दिला.या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातील कचरा डेपोच्या सुरक्षेचा आणि कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – दिनेश वढणे