मुंबईत कस्तुरबा रुग्णालयासह पालिकेच्या विविध रुग्णालांमध्ये एकूण ३७ रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी १२ रुग्णांची सेकंड करोना टेस्ट घेण्यात आली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र असं असलं तरी त्यांना पुढील चौदा दिवस क्वॉरन्टाईन अर्थात विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली आहे.
या १२ रुग्णांची दुसरी करोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. याआधी महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. पुण्यातील दाम्पत्याची चाचणी निगेटिव्ह आल्याचं कालच (२३ मार्च) स्पष्ट झालं होतं. आता मुंबईतील १२ जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु हे सगळे जण पुढील काही दिवस निरीक्षणाखालीच राहणार आहेत.
१२ रुग्णांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये. करोना रोग बरा होत असल्याचं हे लक्षण आहे, असं पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितलं. इतर करोना रुग्णांमध्ये करोनाचे लक्षणं सौम्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याचा आकडा आता वेगाने वाढताना दिसत आहे. बातमी लिहित असताना हा आकडा 101 पर्यंत पोहोचला आहे. यात मुंबई आणि उपनगरात सर्वाधिक 38 कोरोनाबाधित आहेत. तर, त्याखालोखाल पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिघेही मुंबईतील आहेत.