मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातून दोन रस्ते बांधण्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी साडेआठ एकर जमीन “एमएमआरडीए’ला दिली. यामुळे विद्यापीठाचे आर्थिक नुकसान होत आहे. या व्यवहारामध्ये मोठा घोटाळा झाला असल्याची शक्यता असल्याने त्याला तत्काळ स्थगिती द्यावी. अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे.अशी माहिती बुधवारी (दि.१८)रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.
कलिना संकुलातील साडेआठ एकर जमीन “एमएमआरडीए’ला देण्याबाबतचा प्रस्ताव तत्कालीन कुलगुरूंनी १९ मे २०१६ रोजी पत्राद्वारे सरकारकडे दिला होता. या जमिनीवर एक एलिव्हेटेड आणि दुसरा डीपी रोड बनवण्यासाठी परवानगी मागितली होती. या जमिनीच्या मोबदल्यात “एमएमआरडीए’ विद्यापीठाला ३ हजार कोटींचा टीडीआर देणार होते. हा टीडीआरची एमएमआरडीए विक्री करणार आहे. तसेच या विक्रीचे पैसे ठेवण्यासाठी एमएमआरडीएच बॅंक खाते उघडणार असून त्या खात्यातून विद्यापीठाला हवे तेवढे पैसे घेण्याची मुभा देण्यात आल्याचे मुणगेकर यांनी सांगितले.
तसेच हा निर्णय घेण्यापूर्वी कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. या कराराला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही मागणी करणार असल्याचे डॉ. मुणगेकर म्हणाले.