पुणे,२९ जून २०२३ :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज सडेतोड उत्तर दिले. नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. माझी मुलगी स्वत:च्या कर्तृत्वाने तीनवेळा निवडून आलेली आहे. एखाद्यावेळेला पूर्वजांची पुण्यायी उपयोगी पडते. पण दुसरी आणि तिसरी निवडणूक आणि त्यानंतर पार्लमेंटच्या कामात सातत्याने सहभाग ठेवून,उच्च दर्जाचा क्रमांक आहे. तिला आठवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. पण मोदींनी काहीही सांगितले तरी स्वत:चे कर्तृत्व असल्याशिवाय जनता वारंवार निवडून देत नाही. त्यामुळे मोदींचे वक्तव्य हे अशोभणीय आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
संसदेच्या सदस्याबद्दल असे मत व्यक्त करणे योग्य नाही. मी पंतप्रधानांवर व्यक्तीगत टीका करत नाही. कारण ती इन्स्टीट्यूशन आहे. त्याबद्दल सन्मान ठेवला पाहिजे. पण इतर राज्यातील अस्वस्थता दिसून येत आहे, असे शरद पवार म्हणाले.मोदींनी शिखर बँकेबद्दल बोलले. पण मी कोणत्याच बँकेतून कधी कर्ज घेतले नाही. शिखर बँक सोडा, मी कोणत्याच इतर बँकेतून कर्ज घेतले नाही. शिखर बँकेसंदर्भात मागे एकदा तक्रार झाली होती. त्याची चौकशी झाली होती, असे शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीची काही लोकांची काही नावे आली. भाजपमधील काही लोकांची नावे आली. त्यावर चौकशी करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर होती. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्या संबंध काळात त्यांनी काय केले मला माहिती नाही. शिखर बँकेचा उल्लेख करण्याची गरज होती का ते मला माहिती नाही.अशा कुठल्याही संस्थेची आमचा संबंध नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर