कदमांची नार्को टेस्ट करा: सचिन सावंत

मुंबई, ४ सप्टेंबर २०२०: सुशांत मृत्यूप्रकरणी राजकीय वातावरण चांगलंच तापत असल्याचं सध्या दिसत आहे. सेलिब्रेटींपासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत सर्वांमध्येच या विषयावरून हेवेदावे सुरू आहेत. मात्र यामध्ये निशाण्यावर आहेत ते ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिस. यातील एक गट ठाकरे सरकार मुंबई पोलिसांची पाठराखण करत आहे तर एक गट या दोन्हींच्या विरोधात उभा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर कंगना व संजय राऊत यांच्या मध्ये चांगलीच जुंपलेली दिसत आहे. त्यात भाजपचे नेते राम कदम यांनी देखील उडी मारली होती. यावर आता काँग्रेसचे नेते सावंत यांनी राम कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
     भाजपचे नेते राम कदम यांच्यावर आरोप करत सचिन सावंत म्हणाले की, विवेक मोईत्रा यांच्यापासून भाजप आमदार राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी. तसेच अभिनेत्री कंगना रनौत आणि राम कदम यांचे बोलवते धनी हे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस असल्याचा घणाघातही सचिन सावंत यांनी केला.

काय म्हणाले सावंत

     “विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन करुन संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील” असे सचिन सावंत यांनी ट्विटरवर लिहिले आहे.
     “कंगना टीम म्हणजे “कंगना+भाजप आयटी सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व ‘आमची मुंबई’वर प्रेम करणाऱ्या सर्वांचा घोर अपमान केला आहे” असा दावा सचिन सावंत यांनी केला.
     “महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलवते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे” असेही सचिन सावंत म्हणाले.
      “या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. पण या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते, मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का?” असा प्रतिप्रश्न राम कदम यांनी सचिन सावंत यांना ट्विटरवर विचारला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा