नऱ्हे गावाजवळ ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा थरार

पुणे : नऱ्हे गावाजवळ एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकने एका मोटारसायकलस्वाराला धडक दिली. त्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना साडेबाराच्या सुमारास नऱ्हे येथील भूमकर पुलाखाली घडली. भरत वाघ ( वय ४०, राहणार आंबेगाव, पुणे) असे जखमी इसमाचे नाव आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडून भोसरीकडे साखरेची पोती घेऊन निघालेला ट्रक सर्व्हिस रस्त्याने भूमकर पुलाखाली आला. मात्र त्याचा ब्रेक लागत नसल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आल्याने त्याने पुलाला गाडी धडकावून गाडी थांबविण्याच्या उद्देशाने पुलाच्या दिशेने जात होता.
मोटार सायकलस्वार रस्त्याने जात असल्याने त्याला ट्रकची जोराची धडक बसली. या अपघातात मोटार सायकलस्वारच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर काही वेळ भूमकर पुलाखाली वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली .

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा