मुंबई, 26 एप्रिल 2022: मुंबईत हनुमान चालिसा वादानंतर वातावरण तापलंय. दरम्यान, सोमवारी अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यांच्या विरोधात नोंदवलेल्या दुसऱ्या एफआयआरविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलीय. यासोबतच त्यांना खडसावलं आहे.
मात्र, खार पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना दिलासा दिलाय. याप्रकरणी त्यांना अटक होणार नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळण्याची भीती रास्त असल्याचं सांगत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. जेवढी सत्ता जास्त तेवढी जबाबदारीही जास्त असते, असं न्यायालयाने म्हटलंय.
नवनीत राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यांनी आयपीसीच्या कलम 353 अंतर्गत नोंदवलेली एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, आता ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीय. नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी आता सुप्रीम कोर्टात जाण्याचं बोललं आहे.
या कलमांत राणा दाम्पत्याविरुद्ध एफ.आय.आर
कलम 153A म्हणजेच धर्माच्या आधारे दोन गटांमध्ये वैर वाढवल्याबद्दल पोलिसांनी खासदार नवनीत आणि रवी राणा यांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध कलम 353 अन्वये आणखी एक गुन्हा दाखल केला. त्यानंतर रविवारी वांद्रे न्यायालयात फिर्यादी पक्षाने पोलिस कोठडीची मागणी केली होती, ती फेटाळण्यात आली. राणा दाम्पत्यावर देशद्रोहाची कलमेही लावण्यात आली आहेत. मातोश्री हे त्यांच्यासाठी मंदिरासारखे असल्याची तक्रार शिवसैनिकांनी केली. राणा दाम्पत्याच्या भावना दुखावल्या आहेत.
सोमवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, नवनीत राणा यांना हनुमान चालीसा वाचल्याबद्दल अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या वक्तव्यामुळं निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळं अटक करण्यात आली आहे.
मंत्री म्हणाले, ‘नवनीत राणा जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करत होत्या. त्यांचा हनुमान चालीसा वाचण्यास कोणताही विरोध नव्हता. पण दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांना असं का करायचं होतं? त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेत अडचण निर्माण केला, म्हणून त्यांना अटक करण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे