पुण्यात नववर्षाचे स्वागत होणार धूमधडाक्यात

पुणे, २७ डिसेंबर २०२२ : २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस मोठ्या प्रमाणात साजरा झाला. आता वेध लागले आहेत ते नववर्षाच्या स्वागताचे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे; परंतु ही तयारी करताना यंदाचा सेलिब्रेशनवरही कोरोनाचे सावट आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. चीनमधील रुग्णांची वाढती संख्या बघता भारतातही मास्क सक्तीचे निर्बंध लादण्यात आले आहेत; पण चालू वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत धूमधडाक्यात करा, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, रेस्टॉरंट, मंदिरे, चित्रपटगृहे आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती केली आहे. बालवीर दिवसाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क लावून सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

पाच वाजेपर्यंत रेस्ट्रोबार सुरू राहणार
पुण्यात ३१ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत रेस्ट्रोबार सुरू राहणार आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत, तर वाईन, बिअर बार आणि देशी मद्यविक्री दुकाने १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाला महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही कोरोनाचे नियम पाळून ख्रिसमस साजरा केलात त्याचप्रमाणे सरत्या वर्षाला निर्दोष आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशनही करा, या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आवाहनामुळे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनची चिंता कमी झाली आहे.

पोलिस प्रशासनाचाही कडेकोट बंदोबस्त
हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्सवर कोणतेही नवीन निर्बंध जारी केलेले नसून उत्सवाबाबत हॉटेलमालकांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत; तसेच आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत सार्वजनिक ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. तर राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी राज्य शासनाच्या निर्णयाची पुण्यात योग्यरीत्या अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती दिली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा