महापरिनिर्वाण… एका तेजस्वी सूर्याचा अस्त

तुम्हाला बाबासाहेब समजून घ्यायचे असतील, तर तुम्हाला आधी मनुस्मृती आणि त्यावर या देशातील हजारो वर्षे चालवली गेलेली सामाजिक व्यवस्था समजून घ्यावी लागंल. तुम्हाला वर्णवाद समजून घ्यावा लागंल. तुम्हाला मनुवाद समजून घ्यावा लागंल.

तुम्हाला बाबासाहेब समजुन घ्यायचे असतील तर तुम्हाला या देशातील जातीव्यवस्था आधी समजून घ्यावी लागंल. अमुक एका जातीचे आहात म्हणून शिक्षणाचा अधिकार नाकारणारा, सत्तेमधील वाटा नाकारणारा, व्यवस्थेमधील वाटा नाकारणारा आणि माणसाला माणूस म्हणून देखील न समजणाऱ्या मनुवाद्यांचा इतिहास समजून घ्यावा लागंल.

तुम्हाला बाबासाहेब समजून घेण्याआधी ज्या जातीचे आहात त्याच जातीचे काम पूर्वापार करत राहण्याचा मनुवादी कायदा आधी समजून घ्यावा लागंल. हातातील लेखणी सोडून मेलेलं जनावर उचलाव लागेल, त्याचं चमडं काढावं लागंल, मलमूत्र साफ करावं लागंल आणि हे काम तुम्ही एका जातीचे आहात म्हणून तुम्हाला करावं लागतंय हे जेंव्हा तुम्हाला समजंल ना, मग बाबासाहेब समजायला तुम्हाला सोपे जातील आणि फाईव्ह स्टार हॉटेलात देखील ‘जय भीम’ म्हणायला तुम्हाला लाज वाटणार नाही.

हल्ली चहाच्या टपरीवर एखाद्याला ‘जय भीम’ म्हणालं तरी लाज वाटते. त्याला अस्वस्थ होतं. तोंड बारीक होतं. आजूबाजूला कोण त्याच्याकडं बघतं की काय याचाच तो विचार करतो. कुठल्याही एका जातीच्या किंवा धर्माच्याच लोकांनी जयभीम म्हणावं हा शुद्ध मूर्खपणा आहे. एकेकाळी अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्यांनी आरक्षणाची मलाई खाऊन देखील, सामाजिक दबावाचा मनुवाद अजूनही आपल्या मानगुटीवर घेतला आहे. तो दबाव घालवायचा असेल ना तर आणि तरच ‘जय भीम’ म्हणा आणि नसेल म्हणायचं तर तुम्ही सरकारी नोकरीत कोणामुळे आहात ? हा प्रश्न एकदा स्वतःला विचाराच.

बाबासाहेबांनी या देशाला काय दिलं? जी वर्णव्यवस्था हजारो वर्षांच्या प्रबोधनानं संपली नाही. ती वर्णव्यवस्था बाबासाहेबांनी संविधान देऊन संपवली. फक्त संपवली नाही तर एक व्यवस्थाच निर्माण केली. मनुवादावर जबरदस्त घाव म्हणजे संविधान. तो घाव समजुन घ्या. एक थेंबही रक्त न सांडवता झालेली ही क्रांती, वर्गात खालच्या जातीचा म्हणून बसू दिलं जात नाही पासून ते भारतीय संविधान समिती अध्यक्ष पर्यंतचा हा प्रवास निश्चितच थक्क करणारा आहे.

बाबासाहेबांचे उपकार या देशातील बहुजन समाज युगानुयुगे विसरणार नाही. पण, हा इतिहास बहुजन समाजा पर्यंत पोहोचला पाहिजे. तो पोहोचत नाही म्हणून बाबासाहेब आम्हाला समजत नाही.

आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाणदिन, बाबासाहेबांसारखा बहुजन नायक या मातीत जन्मला यासाठी बहुजनांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. या महामानवामुळंच आज तुम्ही व्यवस्थेत आहात. आता ही व्यवस्था टिकवून ठेवायचं काम देखील तुमचंच आहे. कारण बाबसाहेबांसारखा स्वाभिमान जागा असलेला माणूस जन्मायला हजारो वर्षे जातात. मग जे दिलंय टिकवून ठेवा…

– पैगंबर शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा